कोणते निकष लावून अर्जांची छाननी होणार?
पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे अशा जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे 5 निकष लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जांची छाननी होणार आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. ते निकष कोणते खालीलप्रमाणे:
1) अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील, तर लाभ मिळणार नाही.
2) एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्या अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे. एखादा लाभार्थी ‘नमो शेतकरी’ योजनेचा फायदा घेत असेल, तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1500 रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाईल.
3) चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. अशा महिला लाभ घेत असतील, तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.
4) आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे.
5) विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे.